कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती गठीत होणार

यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकतेबरोबर नाविन्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष असतील. त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, स्थानिक आयटीआय चे प्राचार्य या बरोबर माविम आणि उमेद अभियानाचे प्रतिनिधी, खाजगी इन्क्युबेशन सेंटरचे प्रतिनिधी आदी सदस्य या समितीवर असतील. जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या संदर्भांतील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्याच्या खरेदी प्रक्रीयेत स्टार्टप्सना प्राधान्य देण्यास सहकार्य करण्यात येईल. स्टार्टअप्सना क्वालिटी टेस्टिंग पेटंटसाठी सहाय्य करण्यात येईल. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करण्यात येवून त्याद्वारे सर्व स्तर व वयोगटातील महिलांना उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये कौशल्य व रोजगारभिमुख तसेच नाविन्यतेच्या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी गौरवपुर्ण कामगिरी करण्याऱ्या व्यक्ती, संस्थांना ही समिती सन्मानपत्र प्रदान करुन त्यांचा गौरव करेल. मोठ्या उद्योजकांशी चर्चा करुन त्याप्रमाणे आयटीआयमध्ये सुसंगत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम लागु करणे, कामगार बाजाराचा कल ओळखणे, रोजगाराची मागणी आणि पुरवठा यांचा आढावा घेणे. ग्रामिण स्तरावरील स्थानिक कौशल्ये तसेच नवीन संकल्पना शोधुन त्यांना प्रोत्साहन देणे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणे असे विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात या समितीकडुन नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी