बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पना > आज दारव्हा येथून होणार अभियानाला सुरुवात > यवतमाळ जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे > युपीएससी, एमपीएससीसह सरळसेवा परीक्षांविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन > ग्रामपंचायतींमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची उद्या दि. २० जानेवारी दारव्हा येथून सुरुवात होणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यास साहित्य सर्व ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, विविध सरळसेवा भरती परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे, स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा टक्का वाढवा, यासाठी हा अभियान राबविला जात आहे. जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, वनरक्षक, बँकिंग, रेल्वे, सैन्य भरती आदी सरळसेवा परीक्षांसह केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली असून अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या किंवा यापुढे विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष अभियान हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना www.spardhayavatmal.com या वेबलिंकवर नाव नोंदणी करावी. यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसेल. त्याबरोबरच मोफत अभ्यास साहित्य अध्ययनासाठी मिळविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क करावा. सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा परीक्षा पुस्तके लवकरच वितरित होणार आहेत. अभ्यास साहित्याच्या प्रत्येक पुस्तकावर एक क्यूआर कोड असेल. कव्हर पेज वर दिलेला एक क्युआर कोड स्कॅन करून अँड्रॉइड ऍप डाउनलोड करू शकेल व विद्यार्थी सरळसेवा परीक्षांच्या ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी करू शकणार आहे. नोंदणीनंतर पुढील २४ तासांमध्ये विद्यार्थ्यास सरळसेवा परीक्षांसाठी ऑनलाइन कोर्सला मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आणि किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळणार आहे. वैशिष्ट्ये : •जिल्ह्यातील सर्व युवक व युवतींसाठी संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन •कोणतीही प्रवेश परीक्षा नाही •महाराष्ट्रातील सर्वाधिक तज्ज्ञ व नामांकित प्राध्यापक वर्ग •ऑनलाईन वर्ग • जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरळसेवा भरती परीक्षांसाठी पुस्तके उपलब्ध केली जातील.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी