ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

ऑलिपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या राज्यासह देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी जन्मदिवस दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने दि. 28 सप्टेंबर रोजी जाहीर केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच त्यांच्या अधिनस्थ सर्व कार्यालये, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुल,शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय व खाजगी विद्यापीठे, एकविध क्रीडा संस्था किंवा असोसिएशन, क्रीडा मंडळे, क्रीडा अकादमी, शासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ घेतलेल्या व अनुदान मिळालेल्या सर्व संस्था, अन्य संस्था, मंडळानी स्वेच्छेने राज्य क्रीडा दिन साजरा करावा, असे शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे. राज्य क्रीडा दिन साजरा करण्याबाबत रूपरेषा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार 15 जानेवारी राज्य क्रीडा दिनानिमित्त खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करणे, क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे यासाठी रॅली, मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे, विविध क्रीडा स्पर्धा नियमावली, ऑलिपिक स्पर्धासोबतच महत्वाच्या स्पर्धा त्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन, तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद, विविध खेळांचे प्रदर्शनिय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरण करणे. यासह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडू प्रशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी, पालक तसेच क्रीडाप्रेमी नागरीक यांच्यासोबत करिअर संधीबाबत परिसंवाद व चर्चासत्रे, यशस्वी क्रीडा विषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुल, अकादमी, संस्था यांना भेटी देणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात यावे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करून जिल्ह्यातील क्रीडा विश्वात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे स्मरण करुन खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी