जिल्ह्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत २६ व ३० जानेवारी ते १३ फेबुवारी २०२४ या कालावधीत " स्पर्श" कुष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या अभियानात मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पुण्याचे सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहा. संचालक पुणे, डॉ. आडकेकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)डॉ. गोपाळ पाटील यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. या अभियानातंर्गत २६ जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित ग्रामसभेत व सर्व शासकीय कार्यालयात ध्वजारोहणानंतर कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी यांचे जनतेस केलेले आवाहन, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा, सरपंच यांचे भाषण, कुष्ठरोग आजाराबाबत माहीती व संदेश दिले जाणार आहेत. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कालावधी कुष्ठरोग पंधरवडा म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात कुष्ठरोगाबाबत विविध उपक्रमातंर्गत कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शाळा व महाविद्यालय येथे प्रार्थनेच्या वेळी कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन, ३० जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, सायकल रॅली तसेच रेडिओ जिंगल्स प्रसारीत करण्यात येणार आहे. शाळेत कुष्ठरोग पंधरवड्यात शालेय स्तरावर कुष्ठरोगाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कुष्ठरोगाबाबत नुक्कड, नाटक याव्दारे विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी महिला बचत गट, महिला मंडळ, भजनी मंडळ, विविध धार्मिक लोकांना कुष्ठरोगाबाबत माहिती देणे, आठवडी बाजारामध्ये कुष्ठरोग प्रदर्शनी लावणे, कुष्ठरोगाबाबत संदेश देणारे पोस्टर, बॅनर लावणे, तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या कार्यशाळा घेणे, या व्दारे कुष्ठरोग आरोग्य शिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यवतमाळ जिल्हा २०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी समाजामध्ये कुष्ठरोग आजाराविषयी जनजागृती करुन कुष्ठरोग हा इतर आजाराप्रमाणेच जंतुपासून होणारा आजार असुन बहुविध औषधोपचाराने हा आजार १०० टक्के बरा होतो कुष्ठरोगाचे निदान व औषधोपचार हा सर्व शासकिय दवाखाण्यात मोफत केले जातात. हा आजार दैवी कोपामुळे, शापामुळे होत नाही, हा आजार अनुवंशिक नाही. त्यामुळे या आजारबाबत असलेले गैरसमज दूर केले पाहीजे. तसेच कुष्ठरुग्णाबाबत कोणीही भेदभाव करु नये तसेच कुष्ठरोगमुक्त झालेल्या व्यक्तीना ग्रामसभेत बोलावुन त्यांचा सत्कार करावा, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेस केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी