लोकशाही दिन ठरतोय सर्वसामान्यांच्या तक्रारींसाठी व्यासपीठ, जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रारींची गंभीर दखल

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी १५५ तक्रारी दाखल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सर्वसामान्यांच्या तक्रारींची सोडवणूक करणारे व्यासपीठ ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया हे देखील तक्रारींची गंभीर दखल घेत आहेत. नुकताच झालेल्या लोकशाही दिनातील तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवनात जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. यावेळी सुमारे १५५ तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, नगरपरिषद, कृषी, पाटबंधारे, सहकार, भूमि अभिलेख, महावितरण, पोलिस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे. भूमि अभिलेख कार्यालयात बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही बसवा जमिनीसंदर्भातील कामांसाठी अनेकांचा भूमि अभिलेख कार्यालयाशी संबंध येत असतो. बहुतांश वेळेला कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याची तक्रार एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्याची गंभीर दखल घेत भूमि अभिलेख कार्यालयात बायोमेट्रिक मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी दिले. प्रलंबित तक्रारींचा निपटारा करा मागील महिन्याच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी प्रलंबित तक्रार अर्जांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. पूर्वीच्या एकूण २१२ तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहे. या तक्रारींवरील कार्यवाहीचा अहवाल अप्राप्त असून या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन अहवाल सादर करावा व केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिलेत. तसेच लोकशाही दिनातील तक्रारी निकाली काढण्यासाठी सुनावणी घ्यावी. तक्रारींचा निपटारा न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी