यवतमाळात सलग तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्य

Ø 350 वा शिवराज्यभिषेक सोहळानिमित्त आयोजन Ø महानाट्यात 200 पेक्षा अधिक कलावंतांचा सहभाग Ø यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात जवळपास 200 कलावंतांचा सहभाग राहणार आहे. महानाट्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तीन दिवशीय महानाट्याचे उद्घाटन दि.29 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 समता मैदान येथे होईल. उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहे. महानाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे शौर्य, साहस, पराक्रम, विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी राज्यभर जाणता राजाचे प्रयोग केले जात आहे. यवतमाळ येथे दि.29 ते 31 जानेवारी असे एकून सलग तीन दिवस सायंकाळी 6.30 ते रात्री 9.45 यादरम्यान या महानाटकाचे प्रयोग समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक महापराक्रमी योद्धा, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा, रयतेच्या सहकार्यातून, रयतेचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणाऱ्या या राजाची किर्ती आजच्या पिढीला ‘जाणता राजा’ या नाट्य प्रयोगातून समजणार आहे. 1985 साली पुणे येथे या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. अमेरिका, इंग्लंड या देशांसह देशातील 11 राज्यांमध्ये 1146 प्रयोग झाले आहेत. महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक आतषबाजी बघायला मिळणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहकुटुंब प्रयोग बघावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी