सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार - पालकमंत्री संजय राठोड

ग्रामीण भागातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली. नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत नेर तालुक्यातील सर्व ५१ ग्रामपंचायतींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक व साहित्याचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक पदभरत्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात ७५ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. युपीएससी, एमपीएससी, सरळसेवा या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील युवकयुवतींना मोफत स्पर्धा परीक्षांचा पुस्तके ग्रामपंचायत, शाळा, संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहेत. यासह स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामांकीत व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळणार आहे. ‘गाव तिथे वाचनालय’ या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना पुस्तक दिल्यानंतर त्यांचा योग्य वापर होतो की नाही याची तपासणी देखील केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत अमृत महा आवास अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभार्थी मेळावा व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नेर तालुक्यातील घरकुलासाठी निवड झालेल्या ३६१ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने हप्ते देण्यात येणार आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घराचे काम सुरु करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी