नेर येथे अत्याधुनिक डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

> विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे होणार कमी > पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने १ कोटी ८८ लाखांचा निधी नेर शहरातील अशोकनगरमधील नगरपरिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. नेर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मधील अत्याधुनिक डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या शाळेच्या इमारतीची आणि वर्गखोल्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नाने या डिजिटल क्लासरुम निर्मितीसाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एक कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून नेरमधील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मधील चौथी ते सातवीच्या चार वर्गखोल्या ह्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. या चारही वर्गखोल्यामध्ये प्रत्येकी १८ संगणक बसविण्यात आले आहे. यासह शिक्षकांसाठी डिजिटल फळाही बसविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या संगणकांवर ई-बालभारतीची पाठ्यपुस्तके ॲानलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह लिहिण्याची सुविधाही संगणकावर उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. “डिजिटल शाळा संकल्पनेमुळे ई-लर्निंगची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. खाजगीकरणामुळे शिक्षण महागले आहे. खासगी शाळांची फी भरमसाठ वाढली आहे. गोरगरिब विद्यार्थ्यांना खासगी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळांचे रुप बदलण्याचे ठरवले. यासाठी कोटवधींचा निधी खर्च केला जात आहे. डिपीआर तयार केला आहे. पुढील काळात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळा डिजिटल करणार आहोत. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक नेर-नवाबपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी केले. शिक्षक गजेंद्र कणसे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी