कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी कार्यशाळा कापूस उत्पादन क्षमता वाढीसाठी विशेष कापूस प्रकल्प

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दि. २५ जानेवारी रोजी येथील कृषि विज्ञान केंद्र येथे अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाअंतर्गत शेतकरी कार्यशाळा पार पडली. विदर्भातील प्रमुख पीक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा आणि आर्णी तालुक्यात भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यत प्रचार-प्रसार व्हावा यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पार्लावार होते. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कीटकशास्त्र विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर, अभियांत्रिकी विशेषज्ञ राहुल चव्हाण, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. मयूर ढोले, स्नेहलता भागवत, प्रतीक रामटेके, लखन गायकवाड, राधेश्याम देशमुख, शिवानी बावणकर, प्राची नागोसे, रविंद्र राठोड, नयन ठाकरे, भरत राजपूत, शंतनू देशकर, नंदकूमार मेश्राम उपस्थित होते. डॉ.एन.डी.पार्लावार यांनी कापूस पिकाचे कमी खर्चीक व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख तांत्रिक सत्रामध्ये डॉ सुरेश नेमाडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दतीबद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर व मूलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्पादनात वाढ होते आणि मातीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांनी कोणते लागवड अंतर निवडावे याबाबत मार्गदर्शन केले. या शेतकरी कार्यशाळेची प्रस्तावना डॉ. प्रमोद मगर यांनी सादर करतांना या प्रकल्पाचा उद्देश, अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदेशीर होईल व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. तसेच तांत्रिक सत्रामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कापूस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या अतिसंघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूमॅटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याबद्दल माहिती देतांना शास्त्रज्ञ राहूल चव्हाण म्हणाले की, या यंत्राचा वापर करून बी योग्य खोल अंतरावर अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणीसोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील शक्य होते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी