उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व सेवक पुरस्कार अर्ज सादर करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन देणे, वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये ५० हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०२२-२३ च्या पुरस्कारासाठो इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. २२ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी