जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरीता जिल्हास्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेयस्तरावर निबंध, चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. दि. 1 ते 8 जानेवारी दरम्यान स्पर्धा शाळास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी शाळा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती चित्राचे व निबंधाचे मुल्यमापन करुन स्पर्धकाची निवड करण्यात येणार आहे. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय शाळास्तरावर निवड केलेल्या स्पर्धकांची चित्रे, निबंध व नावे संबंधित पंचायतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. शाळास्तरावरुन प्राप्त झालेल्या चित्राचे व निबंधाचे तालुकास्तरीय समिती मार्फत मुल्यमापन करण्यात येणार आहे. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरावरील समिती सदस्य करणार आहे. पंचायत समिती स्तरावर निवड झालेल्या 6 स्पर्धाकांची नावे व चित्र, निबंध गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर पाठवणार आहे. पंचायत समिती स्तरावरील विजयी झालेल्या, दोन्ही गटातील स्पर्धकांची अंतिम निवड जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या समितीकडून करण्यात येईल. निबंध स्पर्धेसाठी 40 मिनिटाचा वेळ व शब्द मर्यादा 1500 देण्यात आली आहे. निबंध लेखनाचे विषय : पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जिवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलजिवन मिशन व माझ्या गावाचा विकास, जलसंर्वधन काळाची गरज या विषयावर निबंध लेखन करायचे आहे. चित्रकला स्पर्धेचे विषय : पाऊस पाणी संकलन, पाणी अडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्व, पाण्याचे वितरण व करप्रणाली, पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग, पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती या विषयावरील प्राप्त निबंध व चित्रांची निवड करण्यात येईल. बक्षिसाची रक्कम : प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, व्दितीय 11 हजार रुपये, तृतीय 5 हजार 500 रुपये तर माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये, व्दितीय 11 हजार रुपये, तृतीय 5 हजार 500 रुपये विजेत्या स्पर्धकास जिल्हास्तरावर सन्मानित करुन बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. पंचायत समिती स्तरावर स्पर्धाचे नियोजन पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील गट समन्वयक, समूह-समन्वयक व जल जीवन मिशनचे आयएसए कर्मचारी करणार आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी