घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद



यवतमाळ, दि. 2 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ­­‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडीत दिनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांसोबत मंत्रालयातून संवाद साधला.
लाभार्थ्यांशी चर्चा करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसह अनेक महत्वपूर्ण योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही अतिशय महत्वाची असून त्यातून नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. तर राज्यात 2019 अखेरपर्यंत सर्वांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात 12 लक्ष घरकुल देण्याचे उद्दिष्ट असून सद्यस्थितीत 6 लक्ष घरे बांधण्यात आली आहेत. तर उर्वरीत घरकुल वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत वाळू रॉयल्टीविना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच घराचा नकाशा तयार करण्यासाठी लागणारी रक्कम कमी करण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील प्रत्येक नागरिकांचे घराचे स्वप्न शासन पूर्ण करेल. शासनाच्या अनेक योजनांची प्रशासनातर्फे चांगली अंमलबजावणी सुरू असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात 21 लाभार्थी उपस्थित होते. यात यवतमाळ, बाभुळगाव, नेर, उमरखेड आणि दिग्रस येथील घरकुल लाभार्थ्यांचा समावेश होता.
०००००००







Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी