जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक



Ø लोकप्रतिनिधींनी घेतला मतदानात भाग
Ø सर्वसाधारण सभेपूर्वी समजून घेतली ईव्हीएम प्रक्रिया
यवतमाळ, दि. 4 :  लोकप्रतिनिधी हा लोकशाही व्यवस्थेचा महत्वाचा घटक मानला जातो. मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतात. आगामी निवडणुका लक्षात घेता सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाभरात ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी जि.प.च्या सर्व सदस्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधींनी मतदानात भाग घेऊन व्हीव्हीपॅटद्वारे दिसणारी मतदान स्लीप व इतर प्रक्रिया समजून घेतली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. याअनुषंगानेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व लोकप्रतिनिधींसाठी ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सदस्यांनी व्हीव्हीपॅटद्वारे मतदान केले. तसेच दिलेल्या मताची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणारी स्लीपसुध्दा बघितली. यावेळी सदस्यांना मतमोजणी करून दाखविण्यात आली.
तत्पूर्वी प्रा. वैभव येंडे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत सर्व सदस्यांना माहिती दिली. जिल्ह्याला 2993 व्हीव्हीपॅट मशीन, 2993 कंट्रोल युनीट आणि 5048 बॅलेट युनीट प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले. मतदान जनजागृतीबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, जि.प.च्या विविध विभागाचे प्रमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी