स्वच्छतेबाबत वारक-यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन - सीईओ जलज शर्मा


Ø स्वच्छतेचा जागर जिल्हास्तरीय कार्यशाळा
यवतमाळ, दि. 15 : वारक-यांचे भजन – कीर्तन, त्यांचा नागरिकांशी होणारा संवाद याचा मोठा प्रभाव समाज मनावर असतो. वारकरी चळवळीच्या माध्यमातून चांगले लोकप्रबोधन होत असल्यामुळे स्वच्छतेबाबत वारक-यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ­‘स्वच्छतेचा महाजागर’ या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य हभप गुलाबराव राऊत, हभप प्रभुदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर, पद्माकर महाराज, मांगीलाल बुटीकर, गोपणे महाराज आदी उपस्थित होते.
26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा जागर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, स्वच्छतेबाबत लोकांचे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासन केवळ मुलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. या अंतर्गत जिल्ह्यात घरोघरी शौच्छालय बांधण्यात आले. मात्र अद्यापही या कुटुंबाकडून शौच्छालयाचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे वारकरी चळवळीच्या माध्यमातून याबाबत लोकांचे आता प्रबोधन करण्यात येणार आहे. लोकांसोबत वारक-यांचा चांगला संपर्क असतो. त्यांच्या बोलण्याचा किंवा प्रवचनाचा परिणामसुध्दा लोकांवर होत असतो. त्यामुळेच शौच्छालय वापराबाबत सामाजिक परिवर्तनाचा उपक्रम आता राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना श्यामसुंदर महाराज म्हणाले, केवळ कायदे किंवा योजनांमुळे जग बदलत नाही. लोकांच्या अंतकरणात हा बदल झाला पाहिजे. लोकांचे प्रबोधन करण्याचे काम वारकरी चळवळ निरंतर करीत आहे. शासनाच्या वतीने शौच्छालय बांधून देण्याची गरज पूर्ण झाली असली तरी ते वापरणा-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या या कार्यात प्रत्येक वारक-याने गावक-यांना शौच्छालयाचे महत्व समजावून सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर म्हणाले, स्वच्छतेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. शासनाकडून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. स्वच्छतेचा लोकजागर या माध्यमातून वारकरी चळवळ गावागावात स्वचछतेचा संदेश पोहचविणार आहे. प्रशासनाने बांधून दिलेले शौच्छालय प्रत्येक कुटुंबाने वापरावे, यासाठी लोकांची मानसिकता बदलविण्याचे कार्य वारक-यांकडून होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन भारत चव्हाण यांनी तर आभार हभप गुलाबराव राऊत यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी