मुद्रा बँकेच्या कर्जामुळे व्यवसायाला उभारी



Ø आठवी उत्तीर्ण युवकाने थाटले हार्डवेअरचे दुकान
      यवतमाळ, दि. 30 : एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल असणे महत्वाचे आहे. कोणाजवळ ते असते आणि कोणाजवळ नाही. मात्र स्वत:च्या कार्यशक्तीवर विश्वास असेल तर भांडवल उभे करण्याचे मार्ग सापडतात. हाच आत्मविश्वास बाळगला पुसद तालुक्यातील पाळोदी येथील रवी रामराव राऊत        (वय 28) या तरुणाने. स्वत:च्या इच्छाशक्तीवर रवीने पुसद येथे हार्डवेअरचे दुकान थाटले. अर्थातच भांडवल उभारण्यासाठी त्याला मुद्रा बँकेच्या कर्जाची साथ मिळाली. एकप्रकारे या कर्जामुळेच रवीच्या व्यवसायाला उभारी मिळाली आहे. या दुकानाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच उद्घाटन केले.
            12 व्या वर्षापासून पुसद येथील हार्डवेअरच्या दुकानात रवी नोकर म्हणून काम करीत होता. या व्यवसायाचा त्याला तब्बल 16 वर्षे अनुभव आहे. स्वत:च्या मालकीचे दुकान असावे, असे त्याला वाटत होते. मात्र त्यासाठी भांडवलाची आवश्यकता होती. भांडवलाशिवाय व्यवसाय उभारणे शक्य नाही, याची त्याला कल्पना होती. त्यातच त्याने सर्वात प्रथम यु-ट्यूब वर मुद्रा बँकेच्या कर्जाविषयी ऐकले. तेव्हाच ठरविले की मुद्राच्या कर्जातून आपण व्यवसाय उभा करू शकतो. पुसद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्याचे खाते होते. तेथेसुध्दा त्याने मुद्रा बँक योजनेचे बॅनर बघितले होते. मुद्रा बँकेच्या कर्जाबाबत त्याने विचारणा केली. सुरवातीला नकारघंटाच पदरी पडली. मात्र तरीसुध्दा रवीने जिद्द सोडली नाही. स्वत:च्या व्यवसायाची फाईल तयार करून बँकेत सादर केली. विशेष म्हणजे यासाठी त्याने सतत पाठपुरावा केला. मागेल ती कागदपत्रे बँकेला सादर केली. तरीसुध्दा कर्ज देण्यास वेळ होत होता. अखेर त्याने ग्रामपरिवर्तक रामेश्वर बरबडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. जिल्हाधिका-यांनी लगेच होतकरु तरुणाला मदत करण्याचे बँकेला सांगितले. काही दिवसांत रवीला मुद्रा योजनेच्या माध्यमातून 4 लक्ष रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जामुळे त्याची स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरली आणि पुसद येथे ‘देवदत्त हार्डवेअर’ असे दुकान त्याने थाटले.  
आठवी उत्तीर्ण असलेला रवी 20 रुपये मिळकतीपासून काम करीत होता. हार्डवेअरच्या व्यवसायाचा अनुभव घेऊन त्याने हिंमत केली. मुद्रा बँकेच्या कर्जाची त्याला जोड मिळाली. त्यामुळे  आज रोज त्याच्या दुकानातून 4 ते 5 हजार रुपयांच्या साहित्यांची विक्री होते. म्हणजे महिन्याकाठी सव्वा ते दीड लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. सद्यस्थितीत त्याच्या दुकानात क्रेडीटवर आठ लक्ष रुपयांचा माल आहे. यात पाण्याची टाकी, ग्रीन-नेट, कुलर व त्याचे साहित्य, पाईप, बिल्डींग मटेरियल, इलेक्ट्रिकल फिटींगचे सामान आदींचा समावेश आहे. हा सर्व माल रवी पुसद एमआयडीसी तसेच अमरावती, नागपूर आणि नांदेडच्या व्यापा-यांकडून घेत आहे. रवीला दुकानात मदत करण्यासाठी त्याचा भाऊ सोबतीला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रोजचे काऊंटर 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास रवीला आहे. यातून व्यवसाय आणखी मोठा करण्याचा त्याचा मानस आहे.   
रवीचा व्यवसाय आज प्रगतीपथावर आहे. गावातील इतर तरुणांना एक आदर्श निर्माण झाला आहे. शासनाच्या सहकार्यातून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रवी नेहमी मार्गदर्शन करतो. पाळोदी हे गाव मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, कृषी, उपजीविका यासोबतच रोजगार निर्मिती व स्वयंरोजगारसाठी गावात विशेष प्रयत्न केले जात आहेत.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी