नागरिकांनो, गाव परिवर्तनाचे साक्षिदार व्हा





Ø रोहडा गावात जिल्हाधिकारी मुक्कामी
Ø गावक-यांशी साधला मध्यरात्रीपर्यंत संवाद
यवतमाळ, दि. 6 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. यासाठी काही गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. विकासाच्या या प्रक्रियेत गावक-यांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी गाव परिवर्तनाच्या विकासाचे साक्षिदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
पुसद तालुक्यातील रोहडा येथे रात्री मुक्कामी राहून जिल्हाधिका-यांनी गावक-यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, सरपंच संजय डोईफोडे, उपसरपंच मारोती टोंपे आदी उपस्थित होते.
  गत दीड वर्षापासून रोहडा येथे अनेक सकारात्मक बदल घडून येत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शासनाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण हे महत्वाचे घटक आहेत. शेतक-यांनी शेतीसोबतच पुरक व्यवसायांकडे वळावे. समृध्द शेतीसाठी शेततळे, फळबाग लागवड, रेशीम शेती, भाजीपाला अशा विविध पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे. सोबतच ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्यावा. गटशेतीबाबत शेतक-यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, गटशेतीच्या माध्यमातून समृध्द शेती करता येईल. महिलांनी सक्षम होण्यासाठी उमेदच्या माध्यमातून लहान-लहान शाश्वत व्यवसायांकडे वळणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचणी असल्यास त्या तातडीने सोडवाव्यात, अशा सुचना त्यांनी उमेद विभागाला केल्या.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून रोहडा येथील अभ्यासिका, सिंचनाची कामे, अंगणवाडी, स्वच्छतेविषयक योजना आदी सामाजिक उपक्रमाबाबत जिल्हाधिका-यांनी समाधान व्यक्त केले.  तसेच आगामी काळात या कामांची गती वाढविण्यासाठी योग्य नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी, अशा सुचना केल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रमाई घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या काही घरकुलाचे सोबतच सिमेंट रस्ता, क्रीडांगण, दलितवस्ती योजनेतील पाणी पुरवठा पाईपलाईनचे भुमिपूजन केले. उन्नत शेती अभियानांतर्गत महिला शेतकरी यमुना चवरे यांना लॉटरी पध्दतीने प्राप्त झालेल्या  ट्रॅक्टरची चाबी जिल्हाधिका-यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी त्यांनी अभ्यासिकेची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक बाळू राठोड यांनी केले. संचालन गजानन श्यामसुंदर यांनी तर आभार ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी मानले. यावेळी जि.प.सदस्य साहेबराव धबाले, उपसभापती गणेश पागिरे, तालुका कृषी अधिकारी पी.एन.राठोड, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आडे, प्रशांत गडदे, ग्रामपंचायत सदस्य गजानन चवरे, सखाराम राठोड, मोहन वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक हरिमकर, प्रकाश राठोड , संतोष गुराई, विवेक मस्के यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी