विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालयांनी संवेदनशील असावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



Ø शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांची बैठक
Ø विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज त्वरीत देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 3 :  महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष प्रवर्ग, एसबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच अर्जाची हार्डकॉपी येणे महत्वाचे आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी विशेष प्रयत्न करून या विषयासंदर्भात संवेदनशीलपणे काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्यवृत्तीसंदर्भात आयोजित महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त किशोर भोयर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांकडून व्हीसीद्वारे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, या संदर्भात असणा-या तांत्रिक बाजू महाविद्यालयांनी त्वरीत सोडवाव्यात. तसेच विद्यार्थ्यांकडून अर्ज येण्याची वाट न पाहता स्वत: अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या महाविद्यालयातील शिष्यवृत्तीचे अर्ज पाठविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे कॅम्प घेऊ त्यांना याबाबत माहिती द्या.
शिष्यवृत्तीच्या अर्जासोबतच हार्डकॉपी प्राप्त करून ते त्वरीत संबंधित विभागाकडे तातडीने पाठविणे गरजेचे आहे. सर्व अर्ज एकत्रित पाठविण्याची वाट पाहू नका, तर जेवढे अर्ज प्राप्त झाले तेवढे त्वरीत पाठवा. पुढील तीन-चार दिवसांत सर्व महाविद्यालयांनी हे काम मिशन मोडवर घेऊन पूर्ण करावे. एकही विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये. विद्यार्थ्यांनीसुध्दा आपले अर्ज परिपूर्ण भरून ऑनलाईन आणि हार्डकॉपीसह महाविद्यालयाकडे सुपुर्द करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
बैठकीला महाडीबीटी पोर्टलचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी