विद्युत विभागाच्या नवीन इमारतीमुळे ‘उर्जा’ मिळणार


Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भुमिपूजन
यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्याला प्रकाश देणारे कार्यालय म्हणून विद्युत विभागाची ओळख आहे. नागरिकांना प्रकाशमय करतांनाच अधिकारी व कर्मचा-यांमध्ये उर्जा असणे आवश्यक आहे. येथे असलेली जुनी इमारत अपु-या सुविधांमुळे आंधारात होती. मात्र आता नवीन इमारत पुरेशा हवा, पाणी आणि नैसर्गिक प्रकाशसह सुसज्ज होत आहे. एकप्रकारे या नवीन इमारतीमुळे ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याची ‘उर्जा’ अधिकारी व कर्मचा-यांना नक्कीच मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
अमरावती परिमंडळ अंतर्गत यवतमाळ मंडळ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ मंडळाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) कविता देशभ्रतार, योगेश वारके, वास्तुशास्त्र विशारद किशोर चिद्दरवार आदी उपस्थित होते.
उर्जा विभागात काम करतांना अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये उर्जा असली पाहिजे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, विद्युत विभागाची जुनी इमारत ही शहराच्या मध्यभागी आहे. शहरातील आर्णि रस्ता हा वर्दळीचा असून 50 कोटी रुपये खर्च करून नवीन रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्यावर ही नवीन इमारत उभी राहत आहे. शहराचे ते एक वैभव आहे. आजच्या काळात वीज ही अत्यंत मुलभूत गरज झाली आहे. येथे येणा-या ग्राहकांचे समाधान करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांचे प्राधान्य असले पाहिजे. या सुसज्ज इमारतीमुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्ये बदल घडून येईल.
यवतमाळकरांच्या सोयीसाठी ही इमारत महत्वाची आहे. शासनाकडे पाठपुरावा करून 10 कोटी रुपये यासाठी मंजूर करून घेतले. ही इमारत इको – फ्रेंडली असून संपूर्ण निधी देण्यात आला आहे. कंत्राटदारांनी नियोजित 11 महिन्यांच्या आधी ही इमारत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी बोलतांना सुचित्रा गुजर म्हणाल्या, उर्जा राज्यमंत्री म्हणून मदन येरावार हे विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची आस्थेने विचारपूस करतात. ही नवीन इमारत त्यांच्याच पाठपुराव्यामुळे उभी राहात आहे. वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी उर्जा विभागातील सर्वजण प्रयत्न करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
नवीन इमारत 41 हजार 500 चौरस फुट क्षेत्रात बांधण्यात येणार आहे. यासाठी एकूण 9.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिक पध्दतीने बांधकाम, प्रशस्त व हवेशीर बांधकाम, सोलर रुफ टॉप व अग्नीशमन व्यवस्था, पावसाचे पाणी जिरविण्याची व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था आदी सुविधा या इमारतीमध्ये राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. संचालन प्रकाश कोळसे यांनी तर आभार संजय चितळे यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन गिरी, राजू पडगीलवार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी