जिल्ह्यात मतदारांच्या संख्येत 1 लक्ष 8 हजाराने वाढ – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख







Ø जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिन
      यवतमाळ, दि. 25 : गत सहा-सात महिन्यांपासून जिल्ह्यात दोषविरहित मतदार याद्या निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी अभियान राबविणे सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 8 हजार नवीन मतदारांची वाढ झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, तहसीलदार शैलेश काळे, निवडणूक विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा हास्य कवी सम्राट मिर्झा रफी अहमद बेग आदी उपस्थित होते.
             निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा महत्वाचा घटक आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत 21 लक्ष 30 हजारांच्यावर मतदार आहेत. गत नोंदणीपेक्षा जवळपास 1 लक्ष 8 हजाराने वाढ झाली आहे. यात महाविद्यालयातील जवळपास 12 हजार नवमतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 40 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. सुरवातीला दर हजार लोकसंख्येमागे  66.46 टक्के मतदार होते. यात आता तीन टक्क्यांनी वाढ झाली असून हा आकडा हजार लोकसंख्येमागे 69.47 टक्के मतदार एवढा झाला आहे. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक गावागावात दाखविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 90 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी व्हीव्हीपॅटद्वारे मत नोंदविले आहे. तसेच नोंदविलेल्या मताची खात्रीसुध्दा केली आहे, असे त्यांनी सांगितले.
            आगामी निवडणुकात एकही मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे. नागरिकांनीसुध्दा मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच आपले कुटुंब, आजुबाजूच्या व्यक्तिंना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.  यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आणि मिर्झा रफी अहमद बेग यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपस्थितांना मतदार जनजागृतीबाबत शपथ दिली.
            मतदार जागृती नोंदणी उपक्रमांतर्गत निवडणूक विभागातर्फे निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात निबंध स्पर्धेतील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयातील अनिता रणखांब, वैष्णवी खाडे, नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयातील ऋषिकेश भुसंगे, मयूर आकडे, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालयातील काजल कुमरे, नंदकिशोर वाळे, वत्कृत्व स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालयातील नेहा कासाम, अमीर बनसोड, डीएमएस आयुर्वेद महाविद्यालयातील स्नेहा जाधव व शिवराज दराडे यांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेत एकूण 13 नागरिकांनी सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक पराग हेडावू, द्वितीय क्रमांक स्वाती खंडाके आणि तृतीय क्रमांक प्रेम जयसिंगकार यांनी प्राप्त केला. तर उत्कृष्ट प्रदर्शनी रांगोळी काढल्याबद्दल संजय सांकोजवार यांचा सत्कार करण्यात आला.
            यावेळी उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून किशोर सुगदे, सत्यम शेंबाळे, जितेंद्र जाधव, विनोद दिवटे आणि शोभा आडे यांचा तर उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून रमेश जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तत्पूर्वी  मतदार जागृती संदर्भात तरुणा देशमुख लिखित नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेत देवेश मजेठिया, तरुणा देशमुख, विद्या चिंचोरे आणि प्रियंका झोपाटे यांचा समावेश होता. तसेच मतदार जनजागृतीनिमित्त सकाळी शहरातून रॅली काढण्यात आली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीकांत देशपांडे यांनी केले. संचालन विद्या चिंचोरे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला निवडणूक नायब तहसीलदार रुपाली बेहरे, प्रमोद बाकडे, दिलीप कडासणे, प्रवीण घोडे, मनिष एंबडवार, संजय गोरलेवार, मोहसीन खान यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिका उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी