निरोगी शरीरासाठी ऑक्सीजन पार्कचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी



Ø तालुका स्तरावर ऑक्सीजन पार्क निर्माण करण्याचे नियोजन
       यवतमाळ, दि. 28 : वन विभागाच्या वतीने शहरालगत निर्माण करण्यात आलेला ऑक्सीजन पार्क हा नागरिकांसाठी आहे. केवळ सहा महिन्यात ही संकल्पना पूर्णत्वास आली, याचा विशेष आनंद आहे. आजच्या काळात शुध्द हवा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी ऑक्सीजन पार्कचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
            शहरालगत अमोलकचंद विधी महाविद्यालयासमोर साकारण्यात आलेल्या ऑक्सीजन पार्कचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहुरकर, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, सहायक वनसंरक्षक विपूल राठोड, मकरंद गुजर, अनंत दिगोळे आदी उपस्थित होते. 
            शहरातील नागरिकांसाठी शुध्द हवेकरीता एखादा पार्कअसावा, या उद्देशाने ऑक्सीजन पार्कची संकल्पना सर्वात प्रथम मे-जून महिन्यात मनात आली, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षीच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत 1 जुलै 2018 रोजी नागरिकांनी येथे ‘माझं यवतमाळ, माझं झाडं’ या संकल्पनेनुसार एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे वन विभाग, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून या वृक्षांचे संवर्धन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले. या पार्कसाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला. येथे केवळ वृक्षलागवड करणे हा उद्देश नव्हता. तर शहरवासियांना फिरण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी शहरालगत ऑक्सीजन पार्क उभारावा, हा मुख्य हेतू होता. यात सर्वांनी योगदान दिले. हा पार्क लोकांसाठी आहे. मुलांच्या खेळण्यासाठी चांगली सोय केली असून ‘ओपन जीम’ सुध्दा साकारण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी याचा उपयोग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. तालुका स्तरावरसुध्दा ऑक्सीजन पार्कची संकल्पना राबविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
            पोलिस अधिक्षक एम. राजकुमार म्हणाले, सहा महिन्यापूर्वी वृक्षारोपणाचा उत्सव येथे साजरा करण्यात आला होता. आता येथे कायापालट झाला आहे. ऑक्सीजन पार्कमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून एक उत्कृष्ट मॉडेल येथे विकसीत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहूरकर म्हणाले, ऑक्सीजन पार्क येथे चांगली वनराई निर्माण करण्यात येईल. या पार्कसाठी पालकमंत्र्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी वृक्ष संवर्धनासाठी मेहनत घेतली आहे. नागरिकांनीसुध्दा या वृक्षांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
            ऑक्सीजन पार्क संवर्धनात मोलाची कामगिरी करणारे कोब्रा ॲडव्हेंचर, प्रतिसाद फाऊंडेशन, प्रयास गृप, गो-ग्रीन फाऊंडेशन, टीडीआरएफ गृप या सामाजिक संघटनांचा तसेच पार्कच्या संकल्पनेचे तांत्रिक सल्लागार रमेश खळतकर आणि येथील वनरक्षक शरद सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी तर संचालन आणि आभार प्रांजली दांडगे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी