नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवा – जिल्हाधिकारी



Ø मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 16 : लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकांत जास्तीत जास्त  मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना व इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. या मतदार जागरुकता मंचच्या माध्यमातून नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर आदी उपस्थित होते.
            निवडणुकात मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, प्रत्येक आस्थापनेवर मतदार जागरुकता मंचची स्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी एक नोडल अधिकारी नेमावा. या मंचच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमात मतदान करण्यासाठी जनजागृती करावी. आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला मतदानाचे महत्व पटवून द्यावे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, वसतीगृहे, व्यावसायिक आस्थापने आदी ठिकाणी मतदान जनजागृतीबाबत चर्चा करावी.  तसेच 26 जानेवारीच्या ग्रामसभेत व पंचायत समितीच्या मासिक सभेत याबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
            जिल्हा प्रशासनातर्फे मतदान पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहे. यात घरोघरी मतदारांच्या भेटी, नवमतदारांना ओळखपत्र वाटप, दिव्यांग मतदारांची नोंदणी, महिला बचत गट व माविमच्या माध्यमातून महिला मतदारांची नोंदणी आदींचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मात्र मतदारांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे सर्व यंत्रणेसह जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांपर्यंत पोहचून मतदान प्रक्रियेत इतरांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
            बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी