गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांची शंका दूर करा



Ø जिल्हाधिका-यांचे शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना
Ø लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा
यवतमाळ, दि. 15 : आरोग्य विभागाच्या वतीने 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर – रुबेलाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी यात उत्तम सहभाग नोंदविला आहे. मात्र अजूनही काही शाळांची कामगिरी  निराशाजनक आहे. विशेषत: उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये लसीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात असलेल्या शंका त्वरीत दूर कराव्यात. यासाठी आरोग्य विभागाने अशा शाळांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गोवर-रुबेला लसीकरणाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लीवार, समन्वयक डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते.
मुलांच्या निरोगी भविष्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास 6 लक्ष बालकांना गोवर – रुबेलाची लस देण्यात आली आहे. यात कोणालाही इजा झाली नाही.  गोवर- रुबेलाची लस बाजारात साडेतीन हजार रुपयाला मिळते. शासनाकडून ती मोफत देण्यात येत आहे. भारतात पोलिओ निर्मुलनाची मोहीम जोरकसपणे राबविल्यामुळे पोलिओ हद्दपार झाला आहे. मात्र ज्या देशांनी ही मोहीम राबविली नाही त्या देशात आजही पोलिओचे रुग्ण आढळतात. यात आपल्या शेजारील देशांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील काही उर्दु शाळांमध्ये गोवर – रुबेला लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. यासाठी समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोग्य विभागाच्या वतीने पालकांच्या शंका दूर कराव्यात.  त्यांना या लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे. आपल्या पाल्यांचे निरोगी भविष्य हेच प्रत्येक पालकांचे प्राधान्य असते. त्यामुळे लसीकरण मोहिमेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
गोवर-रुबेलाची लस घेतली नाही तर अनेक आजार होण्याची शक्यता असते. आजार होण्याचे  हे प्रमाण 25 पट अधिक राहू शकते. यामुळे व्यंगत्व सुध्दा येऊ शकते, अशी माहिती यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. गोवर –रुबेला लसीकरण मोहीम उत्कृष्टपणे राबविणा-या शाळांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात विकास दरणे, मनोज सोनटक्के, दक्षिणा तिरपुडे, वेदधारिणी शाळेचे नीरज डफरे यांचा समावेश होता.
बैठकीला अंजूमन उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद एहसान रहीम, शगुफ्ता नसरीन, मुक्ती ऐजाज, मोहम्मद वसीम यांच्यासह इतर शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी