जिल्ह्यातील शेतक-यांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद





लोकसंवाद कार्यक्रमात नऊ शेतकरी व्हीसीद्वारे थेट ‘लाईव्ह’
यवतमाळ, दि. 14 : कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी       शेतक-यांशी थेट संवाद साधला. माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांसोबत व्हीसीद्वारे बोलले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पार पडला.
मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणा-यांमध्ये दिग्रस तालुक्यातील विठोली येथील रविंद्र राऊत, किन्ही (ता.केळापूर) येथील अभय कट्टेवार, अंबोडा (ता.आर्णि) येथील माधव राऊत, मादणी (ता.बाभुळगाव) येथील वच्छला गर्जे, सुकळी (ता.उमरखेड) येथील अशोक वानखेडे, राजचांदणा (ता.यवतमाळ) येथील अरविंद बेंडे, वडगाव (ता.दिग्रस) येथील भाऊराव भुसंगे, दोनाडा (ता.कळंब) येथील माणिक कदम आणि घाटंजी तालुक्यातील पारडीनस्करी येथील संजय निकडे या शेतक-यांचा समावेश होता.
मादणी येथील वच्छला गर्जे यांनी शेतीमध्ये फळबाग, सामूहिक शेततळे, गटशेती या कृषी विभागाच्या योजनांचा फायदा कसा झाला याबाबत माहिती दिली. शेततळ्यांच्या पाणीसाठ्यामुळे शेतातील सिताफळ, आंबा, मोसंबी व इतर शेतमाल जगविता आला. तसेच या शेततळ्यात आता मत्स्यबीज टाकून मासे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. यातून दीड लक्ष रुपये उत्पन्न येऊ शकते, असे सांगितले. याबाबत संवाद साधतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वच्छलाताईंनी केलेल्या शेततळ्यातून मत्स्यशेती या अभिवन प्रयोगाची इतर शेतक-यांनी दखल घ्यावी. यामुळे शेतक-यांच्या उत्पानात वाढ होईल.
विठोली येथील रविंद्र राऊत यांनी रेशीम शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, तसेच आतापर्यंत परिसरातील 150 शेतक-यांना रेशीम शेतीकडे वळविण्यात यश मिळाले असून त्यांच्यासाठी नियमित विनामुल्य प्रशिक्षण आयोजित केली जातात असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कुटुंब प्रमुखाव्यतिरिक्त त्या कुटुंबातील इतरही सदस्यांचा समावेश करावा, अशी सुचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, शेतक-यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची सुचना आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेत कुटुंबातील इतरही सदस्यांना समाविष्ट करून घेण्याचा शासन स्तरावर नक्कीच विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत पैनगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे अंबोडा येथील माधव राऊत मुख्यमंत्र्यांशी बोलतांना म्हणाले, 450 शेतकरी या कंपनीचे सदस्य आहोत. धान्याच्या क्लिनिंग ग्रेडींगसाठी लागणारी मशीन तसेच दाल मिल सुरू केली आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून 13.50 लक्ष रुपये प्राप्त झाले. गत वर्षी या माध्यमातून 5500 क्विंटल डाळ प्रक्रिया केली असून सर्व शेतकरी मिळून 55 लक्ष रुपये अतिरिक्त्‍ नफा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांच्याशी संवाद साधतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतक-यांनी शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या उत्पादनात तसेच उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.      
शेतक-यांसोबत संवाद साधतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन अनेक शेतीपयोगी योजना राबवित आहे. 10 हजार कोटींपेक्षा जास्त निधी कृषी विकासाकरीता देण्यात आला आहे. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार या महत्वाच्या योजना राज्य शासनाने राबविल्या आहेत. मागेल त्याला शेततळ्यांमुळे 36 लक्ष हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय निर्माण झाली आहे. राज्यात 1 लक्ष 37 हजार शेततळे तर 1 लक्ष 30 हजार सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. माती परिक्षण कार्ड प्रत्येक शेतक-याने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-यांना आपले उत्पादन लक्षात येते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र ॲग्रीटेक’ प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत दीड कोटी शेतकरी डिजीटल प्लॅटफॉर्मवर येतील. तसेच पेरणी ते कापणीपर्यंत सर्व माहिती शेतक-यांना उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील इतरही शेतक-यांनी शेटनेट, सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, गटशेती, रेशीम शेती, कृषी यांत्रिकीकरण आदी विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लोकसंवाद या कार्यक्रमाला विविध तालुक्यातील 15 शेतकरी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी