आश्रम शाळेतील प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे उच्च शिक्षण आणि करियर यावर आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* यवतमाळ,दि १४, जिमाका :- उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती असून केंद्रीय विद्यापीठे आणि देशातील टॉप विद्यापीठांमध्ये आदिवासींच्या जागा रिक्त राहतात. आश्रम शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी एकलव्य सोबतचा हा उपक्रम खूप महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा प्रशासन आणि एकलव्य संस्था यवतमाळ यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित अशा एकूण २६ आश्रम शाळांमध्ये ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसोबत उच्च शिक्षण आणि करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन चिचघाट उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री येडगे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, प्रशांत चव्हाण उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. नोकर भरतीमध्ये उच्च शिक्षित आदिवासी उमेदवार मिळत नाही. त्यामानाने स्पर्धा कमी असुनही केवळ शिक्षणाचा अभावामुळे नोकरी मिळु शकत नाही. पर्यायाने आदिवासी बांधवांचे आणि समाजाचे एका परीने मोठे नुकसान होत आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी याशनी नागराजन यांनी चांगलं कॉलेज, चांगला जॉब आणि चांगली जीवनशैली याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा आणि पुसद विभाग, नोडल अधिकारी, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश शिर्के, प्रा. घनःश्याम दरने आणि आश्रम शाळा शिक्षक, एकलव्य टीम मधून प्रशांत चव्हाण, आकाश मोडक, स्मिता ताटेवार आणि एकलव्य माजी विद्यार्थी आणि रिसोर्स पर्सन उपस्थित होते. पहील्या कार्यशाळेत जवळपास १०० विद्यार्थी (११ वी आणि १२ वी) चे सहभागी होते. उच्च शिक्षण का, कुठे आणि कसे घ्यायचे यावर कार्यशाळा पार पडली. हे कार्यक्रम आदिवासी तरुणांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या वाटा प्रशस्त करणारे पाऊल ठरेल अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी