पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती समारोह उत्साहात संपन्न
* दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी
यवतमाळ, दि. 29 (जिमाका) : समाजातील गोर-गरीब, वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पाहोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतिक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पांडे, विजय कद्रे, मनीष गंजीवाले, गजानन परसोडकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान ही जवळपास 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारली असून, ती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि अतिशय मागासलेल्या आदिवासी पारधी समाजाला मदतीचा हात देत आहे. या संस्थेने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाचं एक जीवंत उदाहरण तयार केले आहे, असे प्रतिष्ठानाच्या कार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतूक केले.
पंडीत दीनदयाल यांनी अत्यंत खडतर जीवनातून मार्गक्रमण करीत कष्टमय जीवन जगून अभ्यासाचा ध्यास धरुन शिक्षण पूर्ण केले. सरकारी नोकरीची संधी असताना सुध्दा त्यांनी ती नाकारली. इंग्रजांची नोकरी करण्याऐवजी त्यांनी आपल्या समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. नंतर, जनसंघाची स्थापना झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेशचे प्रमुख, अखिल भारतीय महामंत्री आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. एवढ्या मोठ्या पदांवर असतानाही त्यांच्या जीवनशैलीत कोणताही बदल न होता ते त्यागपूर्ण जीवन जगले, असे सांगत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनप्रवासावर मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक पैलू उलगडत प्रकाश टाकला.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या काळात जगामध्ये भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन विचारसरणींचा बोलबाला होता. या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा तिसरा विचार त्यांनी मांडला. भारतीय जीवन पद्धतीतच सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं उत्तर आहे, असे पंडित दीनदयाल यांनी सांगितलं होतं. एकात्म मानव दर्शनाचं मूळ तत्त्व 'अंत्योदय' आहे, ज्याचा अर्थ समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास करणे होय. समाजातील शेवटचा दूर्बल घटक हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. राष्ट्राचा सर्वांगिण विकास करावयाचा असल्यास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व सुविधा पोहोचल्या पाहीजे, हा विचार त्यांनी सर्वदूर पोहोचवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच अंत्योदय विचारावर काम करीत असून त्यांनी गरिबांसाठी घरे, शौचालये, गॅस, वीज आणि रोजगार यावर गुंतवणूक केली. या धोरणामुळेच गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले. यामुळेच भारत जगातील 11 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने नैसर्गिक शेतीचा एक आदर्श प्रकल्प सुरू केला असून दीनदयालजींच्या विचारावर काम करत, शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार केले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे हे या मॉडेलचे उद्दिष्ट आहे. राज्यातही 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत 13 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली गेली आहे. तसेच, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आणि प्राथमिक सोसायट्यांना बहुउद्देशीय संस्था बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी 'लखपती दीदी' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट आहे. कारण महिलाच कुटुंबाची खरी काळजी घेतात आणि त्यांना सक्षम केल्यास संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीही मोठं काम केलं आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचं परिवर्तन घडवलं आहे. पंडित दीनदयाळजींनी समाजासाठी जे कार्य केलं, ते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हतं. त्यांचे 'विचार' अमर आहेत. जरी त्यांची हत्या झाली, तरी त्यांचा विचार अधिक वेगाने पसरला आणि आज तोच विचार मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवला जात आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकस्थळी मुख्यमंत्री यांनी भेट देऊन पंडित दीनदयालजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार वाहून विनम्र अभिवादन केले. यावेळी मूर्तीकार सुजीत गौड व सौ. स्वाती सुजीत गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभ कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या परिसरात असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली.
संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण प्रबोधिनि, शबरी अतिथी गृह, निवासी संकुल, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कक्ष, कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदींची पाहणी करुन प्रवेशव्दारा समोरील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पंडित दीनदयाल यांच्या जीवनपटाचीही माहिती त्यांनी घेतली. यावेळी निवासी संकुलाच्या आवारात मुख्यमंत्र्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment