समाजाला अपेक्षित बाबी आणि वास्तविकता लोकांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री येरावार

यवतमाळ, दि. 3 : भारतीय लोकशाहीत प्रसार माध्यमांना विशेष स्थान आहे. प्रिंट मिडीयाची जागा आज काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली आहे. हे ज्ञानाचे भांडार आहे. जनतेचा आवाज यातून बुलंद होतो. मात्र आज चमचमीत बातम्यांना प्राधान्य आले आहे. त्यामुळे समाजाला अपेक्षित बाबी आणि वास्तविकता माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
वायझेड वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, माजी मंत्री तथा वायझेड वृत्तवाहिनीचे संचालक राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते.
प्रसार माध्यमांनी आपले मत सैदव मांडले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करतांना चांगल्या गोष्टीसुध्दा लोकांसमोर जायला पाहिजे. वृत्तपत्रांमधून जनतेचा आवाज बुलंद होत असतो. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी हे एक पक्षाची किंवा एका विचाराची नसते. ती जनतेची असते. याचा व्याप मोठा आहे. एकप्रकारे ते ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ही वृत्तवाहिनी पोहचत असतांना जिल्ह्यातील यशकथासुध्दा लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्यातून इतरही नागरिक प्रेरणा घेतील आणि आपल्या वृत्तवाहिनीवर प्रेम वृध्दींगत होण्यास मदत मिळेल. राजाभाऊ ठाकरे यांनी भविष्यात एक नवी दिशा देणारे पाऊल टाकले आहे. या माध्यमातून यवतमाळचे नावलौकिक होईल. राज केबलच्या माध्यमातून 12 वर्षे प्रत्येकाच्या घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात पोहचण्याचे कार्य झाले आहे. एवढा दीर्घ काळ या क्षेत्रात टिकणे, हे आपल्या यशाचे गमक आहे.. त्यामुळे पुढेसुध्दा वायझेड वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांच्या मनात कायम घर करून राहाल, अशा आशावाद पालकमंत्री येरावार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृत्तवाहिनीचे संचालक राजाभाऊ ठाकरे यांनी तर संचालन कैलास राऊत यांनी केले. यावेळी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, राजू डांगे, चंद्रकांत गाडे पाटील, अशोक सिंघानिया, आनंद जगताप, राजेश ठोके आदी उपस्थित होते.
                                                            00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी