ध्वजदिन निधीसाठी सर्वांनी मदत करावी - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा
यवतमाळ, दि. 7 : महाराष्ट्राला शौर्याची मोठी परंपरा आहे. यात अनेकांना वीरमरण आले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील 17 जवान आपले कर्तव्य बजावत असतांना देशासाठी शहीद झाले. त्यांच्या पश्चात वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुसह्य व्हावे, याकरीता ध्वजदिन निधीसाठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फेत आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर निवृत्त कॅप्टन दिनेश नारायण तत्ववादी, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. मुद्दमवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते.
            जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक तसेच सैनिकांच्या कुटुंबाकरीता अनेक योजना राबविल्या जातात, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, गतवर्षी जिल्ह्याला 60 लक्ष 98 हजार रुपयांच्या ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट होते. यात जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत 119 टक्के म्हणजे 73 लक्ष ध्वजदिन निधी संकलित केला. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि सर्व विभागाचे अभिनंदन. यावर्षीसुध्दा उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलित होईल, असा विश्वास आहे. जिल्ह्यात 1181 माजी सैनिक, 624 विधवा पत्नी आणि दुस-या जागतिक महायुध्दात सहभागी होणारे 79 माजी सैनिक व विधवा आहेत. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा निधी गोळा होत असल्याने तसेच या निधीतून त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक योजना अंमलात येत असल्याने जास्तीत जास्त मदत करणे, हीच शहिदांना खरी श्रध्दांजली ठरेल. माजी सैनिकांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहेच. एवढेच नाही तर माझे कार्यालयसुध्दा त्यांच्यासाठी उघडे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
            यावेळी मान्यवरांच्या हस्ते अलकनंदा सरवरे, राधाबाई बोरीकर, सत्वशिला काळे, मंगला सोनवणे, नंदाबाई पुराम, सुनिता बिरे, स्नेहा कुडमेथे या वीरपत्नी-वीरमाता आणि यशवंत थोरात या वीरपिता यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक असलेल्या गणपती क्षीरसागर यांचा मुलगा शुभमने इयत्ता दहावीत 93 टक्के गुण मिळविल्याने त्याचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शुभमला प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी तर संचालन कल्याण बोबडे यांनी केले. कार्यक्रमाला कल्याण संघटक सुभेदार रामचंद्र जाधव, हवालदार अरविंद धनवीज, हवालदार विष्णु मोंढे, नायक रामकृष्ण चौखंडे, सैनिकी मुलींच्या वसतीगृहाच्या अधिक्षिका कुमुदिनी निंभोरकर यांच्यासह माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, विरपत्नी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी