ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा







Ø ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा
यवतमाळ, दि. 09 : कर्तव्य बजावत असतांना सिमेवर वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलित केला जातो. शहिदांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या या योजनांकरीता ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने बचत भवन येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, सा.बा.विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ उपस्थित होते.
ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ झाला, असे जाहीर करून जलज शर्मा म्हणाले, ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्हा हा अग्रेसर राहिला आहे. गतवर्षी जिल्ह्यात 55 लक्ष रुपये निधी संकलित झाला आहे. ही टक्केवारी 110 आहे. यावर्षीसुध्दा सर्वांच्या सहकार्याने वेळेपूर्वी ध्वजदिन निधी संकलित करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार म्हणाले, आपल्या सैनिकांमुळे आपण आहोत. पोलिस विभागात जे माजी सैनिक कार्यरत आहेत, त्यांना त्यांच्या सोयीनुसार नियुक्ती दिली जाते. देशाच्या संरक्षणासाठी लढणा-या या जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलिस विभाग व जिल्हा प्रशासन नेहमीच मदतीसाठी तत्पर आहे, असे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे म्हणाले, सैन्याची नोकरी हे एक वेगळेच आव्हान आहे. कुटुंबापासून दूर राहून सैनिक देशसेवा करतो. सैन्याच्या नोकरीत देशासाठी त्याग करण्याची भावना असते. केवळ सीमेवर संरक्षणच नाही तर देशांतर्गत कोणतीही आपत्ती आली तर सैन्याला पाचारण केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सैनिकांसाठी भजने लिहिली आहेत. यावर्षी जिल्ह्यात विक्रमी स्वरूपात निधी गोळा करू, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी अलकनंदा पुंजाजी सरोदे, वीरपत्नी सत्वशिला साहेबराव काळे, वीरपत्नी मंगला देवचंद सोनवणे, वीरपत्नी नंदा दादाराव पुराम, वीरपत्नी सुनिता प्रकाश विहिरे, वीरपत्नी स्नेहा विकास कुडमेथे, वीरपत्नी राधाबाई रामाकृष्ण बोरीकर, वीरपिता यशवंत थोरात यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संजय पांडूरंग ढोकणे आणि अनिल भागवत यांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी तर संचालन बालाजी शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाला वीर नारी, वीर पिता, वीर माता यांच्यासह माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, सैनिकी वसतीगृहाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. ******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी