प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह




* जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
यवतमाळ दि.01 : असंघटित कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली.
यावेळी सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी दोन्ही योजनांबाबत माहिती दिली. तसेच नागरी सुविधा केंद्र (सीएससी) च्या माध्यमातून सादरीकरण केले. या योजनेत सर्व संघटित कामगार व किरकोळ व्यापारी / दुकानदार किंवा स्वयंरोजगार करणारा, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृह उद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघू व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत असंघटीत क्षेत्रातील पात्र कामगारांनी तसेच किरकोळ व्यापारी / दुकानदार आदींनी नोंदणी करावी, असे आवाहन प्र.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, कामगार अधिकारी काळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन व लघु व्यापाऱ्याकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजनेत नोंदणीची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पात्रता : असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 18 ते 40 दरम्यानचा कामगार, मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी, कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा, प्रधानमंत्री लघु व्यापाऱ्याकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजनेची पात्रता : असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष अठरा ते चाळीस दरम्यानचा किरकोळ व्यापारी / दुकानदार किंवा स्वयंरोजगार करणारा व्यक्ती, वार्षिक उलाढाल रुपये 1.5 कोटी किंवा त्यापेक्षा कमी, कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्यनिर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा व प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा सभासद नसावा व आयकर भरणारा नसावा. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थीने रुपये 55 ते 200 पर्यंत प्रतिमाह वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अंशदान जमा केल्यास लाभार्थीस वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तिवेतन देय राहील, योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीस नजीकच्या नागरी सुविधा केंद्राय (Common Service Centers) भेट द्यावी लागेल, लाभार्थीस नागरी सुविधा केंद्रांमध्ये गेल्यानंतर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
आधार कार्ड, बँक पासबुक, (राष्ट्रीयीकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली इतर कोणतीही बँक) भ्रमणध्वनी क्रमांक (ओटीपी करिता स्वतःचा अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा), पहिले मासिक अंशदान (वयानुसार, रोख स्वरूपाने), नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील, ईमेल आयडी, वारसदार (पती / पत्नी) व भ्रमणध्वनी क्रमांक याबाबतचा तपशील अद्ययावत केला जाईल, लाभार्थीच्या वयानुसार अंशदानांची रकमेची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येईल. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांच्या वयानुसार पहिल्या मासिक अंशदानाची रक्कम रोखीन अदा करावी लागेल. अंशदानाची रक्कम भरणा केल्याची पावती संबंधीत नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थीस देण्यात येईल, दुसऱ्या मासिक अंशदानापासून लाभार्थीचे अंशदानाची रक्कम, लाभार्थीच्या बँक खात्यामधून परस्पर कपात करण्यात येईल.
00000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी