जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



v वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्याची टीम रवाना
यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

            सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील पहिली टीम आज (दि.6) रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवितांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, डॉ. नितीन खर्चे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, तालुका समन्वयक समाधान इंगळे, आश्विनी गवारे, आगार व्यवस्थापक एस.बी. डफळे आदी उपस्थित होते.
            वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील 9 गावातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. प्रशिक्षणानंतर तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल. नवीन जिद्द, नवीन प्रेरणा घेऊन या स्पर्धेत सर्वांनी काम करायचे आहे. तुमच्या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील इतर नागरिकांना नक्कीच होईल. लोकसहभागाने आपण दुष्काळावर मात करू शकतो, हे या स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे, असे ते म्हणाले.
            यवतमाळ तालुक्यातील खानगाव, शिवणी, भारी, कापरा, मडकोना, धानोरा, बोदगव्हाण, तिवसा आणि झुली या 9 गावातील 45 नागरिकांची पहिली बॅच आज रवाना झाली. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वाठोडा येथे चार दिवसांचे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यात 97 गावांचे नियोजन असून अशा एकूण 6 बॅचेस प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यात सर्वात जास्त तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ, दारव्हा, कळंब, उमरखेड, राळेगाव आणि घाटंजी या तालुक्यांचा यात समावेश आहे. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.   
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी