धडक विहिरींमुळे शेतापर्यंत सिंचनाची सोय - पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ, दि. 17 : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वाभिमानाने उभा राहण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहिर अशा अनेक योजनांची प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक तालुक्याला 300 याप्रमाणे जिल्ह्यात 4 हजार 800 धडक सिंचन मंजूर झाल्या आहेत. ख-या अर्थाने या विहिरींमुळे शेतापर्यंत सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

            नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शेतक-यांना विहिरींचे कार्यारंभ आदेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर पंचायत समिती सदस्य नरेश ठाकूर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते.
            धडक सिंचन विहीर हा राज्य शासनाने फ्लॅगशीप कार्यक्रम म्हणून हाती घेतला आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या विहिरी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी शेतक-यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात कालवे, पाटस-या, मायनर, सब मायनर आदींचे काम करण्यासाठी 132 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या इसबिक योजनेंतर्गतसुध्दा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना राबविली. या योजनेचा सर्वाधिक लाभ बीड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांना झाला आहे.
            मागेल त्याला शेततळे अंतर्गत जिल्ह्यात 3600 शेततळे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आजही शेततळ्याची मागणी शेतकरी करू शकतात. धडक सिंचन विहिरींमुळे आता शेतक-यांना वेगवेगळी पिके घेणे शक्य आहे. त्यातून शेतक-यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर त्वरीत विहिरीचे काम करून घ्यावे. विशेष म्हणजे विहिरीचे काम पूर्ण होताच शेतक-यांना कृषी पंप जोडणी देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
            यावेळी किन्ही येथील सुनील मरगडे, बाबाराव मरगडे, संजय तलमले, बाबुसिंग जाधव, इचोरी येथील नरेश चमेडीया, पुष्पा शिंदे, गुलाब तितरे, भास्कर खडसे, मडकोना येथील अंबादास दोनाडकर, कैलास गायधणे जीवन माकडे यांच्यासह एकूण 46 शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले. संचालन राजेंद्र घोंगडे यांनी तर आभार गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
                                                 000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी