मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख




v मराठी भाषा गौरव दिन, सुलेखन तथा भू-अलंकरण प्रदर्शनी
यवतमाळ, दि. 27 : मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. मराठी ही लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजेचे असून तीच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन तसेच संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. भराडी, माहिती व सुचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर, प्रदर्शनीच्या संयोजिका राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.
            विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मराठी भाषा, साहित्य आणि मराठी संस्कृतीसाठी कुसुमाग्रजांनी मोठे योगदान दिले आहे. आपली मातृभाषा ही अनेक संस्कारापासून विकसीत झाली आहे. राज्य शासनाने भाषा संचालनालय, मराठी साहित्य मंडळ, मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, भाषा सल्लागार समिती आदींची स्थापना केली आहे. प्रशासनामध्येसुध्दा मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेचा उपयोग केला जातो. मराठी ही लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजचे आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
            युरापियन देशात स्वत:च्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. जर्मनीमध्ये जर्मन, फ्रान्स मध्ये फ्रेंच, स्पेन मध्ये स्पॅनीश आदी देशात त्यांच्या मातृभाषेला प्रथम प्राधान्य असून इंग्रजी ही तेथे दुय्यम स्वरुपाची आहे. या देशातील तंत्रज्ञानातसुध्दा मातृभाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे आपल्या मुलांनाही मराठी भाषेतून शिकविण्याचा निर्णय घेतला. आणि दोन्ही पाल्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून झाले, याचा मला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीने दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
            यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, कोणतीही भाषा वाईट नसते. भावना व्यक्त करण्याचे ते एक माध्यम आहे. मराठी भाषा अतिशय प्राचीन आहे. ती हळूहळू विकसीत झाली. भाषा प्रभावीपणे बदलत असते तसेच चालिरीती आणि परंपरासुध्दा बदलतात. भाषा आणि परंपरा यांचे एक वेगळे नाते आहे. भाषेच्या समृध्दीसाठी अनेकांनी योगदान दिले असून मराठीला आणखी प्रगत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर भाषेतून संस्कृतीचा जन्म झाला. साहित्य हे प्रबोधनाचे साधन आहे. नवीन पिढीने कुसुमाग्रज वाचले पाहिजे. मराठीचा गौरव केवळ एका दिवसाकरीता नव्हे तर नेहमी झाला पाहिजे, असे संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर यांनी सांगितले. यावेळी अंजली सरूरकर, वेदश्री घोरकर यांनी गीत सादर केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन प्रा. ताराचंद कंठाळ यांनी तर आभार जीवन कडू यांनी मानले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच संस्कार भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन व ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन : येथील जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब उपस्थित होते.
            फित कापून ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालयातील विजय मुळै, रविंद्र वानखेडे, लालसा गुल्हाणे यांच्यासह ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी