जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण चेतना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी 484 शिक्षण स्वयंसेवकांची कंत्राटी तत्वावर 89 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या तात्पुरत्या स्वरुपातील भरतीसाठी जिल्हा परिषदेला अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त जिल्हा खनिकर्म योजनेअंतर्गत बाधित व अबाधित क्षेत्रांतील शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकांची 414 तर माध्यमिक शिक्षकांची 70 अशी एकुण 484 पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही नियुक्ती देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या शिक्षण स्वयंसेवकांना 7 हजार 500 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक उमेदवार हा टीईटी परिक्षा उत्तीर्ण असावा.टीईटी उमेदवार उपलब्ध न झाल्यास डिएड परिक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. डिएड उमेदवार उपलब्ध न झाल्यास मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए किंवा बीएससी किंवा बीकॉम पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेतील बीएड परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पंचायत समिती निहाय प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण स्वयंसेवकांची पदे निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यात 24, बाभूळगाव 13, दारव्हा 20, दिग्रस 20, कळंब 16, अबाधित क्षेत्रांतील महागावा तालुक्यात 31, घाटंजी 27, पुसद 46, राळेगाव 26, उमरखेड 57,प्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील वणी 30, मारेगाव 15, झरी जामणी 31 आणि नेर 20, पांढरकवडा 12, यवतमाळ तालुक्यात 26 तसेच अत्यावश्यक माध्यमिक शाळेवरील 70 पदे निर्धारित करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी काढले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी