जिल्ह्यात चार महिने चालणार आयुष्मान भव: मोहीम

आरोग्य विभागांतर्गत सर्व वयोगटांतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करण्यासाठी जिल्ह्यात आयुष्यमान भव: मोहिमेचा १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. ही मोहीम चार महिने चालणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेण्यात आली.
सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.चव्हाण, डॉ प्रेमकुमार ठोंबरे, डॉ.रमा बाजोरिया, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, आयुष्मान समनव्यक डॉ.दर्शन चांडक, सुरेंद्र इरपनवार उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भव: मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विषयक तपासण्या करण्यात येणार आहे. आयुष्यमान आपल्या दारी ३.० या उपक्रमामध्ये जिल्ह्यांतील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्यमान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्यमान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग, आयुष्यमान कार्ड व आभा कार्डसोबत जागृती करण्यात येणार आहे. आयुष्यमान मेळावा अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कर्करोग, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा इत्यादींबाबत जनजागृती करणे तसेच आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड तयार करणे यासह आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान भव: मोहिमेचा लाभ घ्यावा, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले. दर आठवड्याला तपासणी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर दर आठवड्यास तपासणी केली जाणार आहे. चार आठवड्यापर्यंत ही तपासणी होणार आहे. आयुष, मानसिक आरोग्य वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, नाक व घसा आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी व टेलिकन्सल्टेशन सेवा देण्यात येणार आहेत. मुलांच्या ३२ सामान्य आजारांची तपासणी आयुष्यमान भव: मोहिमेदरम्यान सर्व अंगणवाडीतील मुले व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मुलांच्या ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता असल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्यदेखील देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांनी या मोहिमेदरम्यान आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी झाली ना? याची खात्री करणे अपेक्षित आहे. "जिल्ह्यात आयुष्यमान भव: मोहिमेचा शुभारंभ झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील मुलाची देखील तपासणी व उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल." - डॉ मैनाक घोष - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी