कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पिकांचे सर्वेक्षण करुन उपाययोजना करा - डॉ. डी. बी. उंदिरवाडे

कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून पिकांचे सर्वेक्षण करुन वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे.
डॉ. उंदिरवाडे यांनी त्यांच्या चमूसह अकोला जिल्ह्यातील काही परिसरात केलेल्या पाहणीत कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. म्हणुन ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे त्यांनी निरीक्षण करावे. असा इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. या उपाययोजना करतांना नत्र खते व संजीविकांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. गुलाबी बोंडअळीवर पाळत ठेवण्यासाठी पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनंतर फोरोमोन सापळयाचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे तसेच मास ट्रैपिंगसाठी हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे वापरावेत. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या.
पीक उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रती १० ली पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पीक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावे. फुलामधे प्रादुर्भाव ५ टक्क्यापर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रती १० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव ५ ते १० टक्के आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव १० टक्क्याच्यावर असेल अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये यासाठी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी