जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

प्रशासनाच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट तर दि.७ सप्टेंबर रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विज पडून होणारी जीवितहानी व वादळी वाऱ्यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्याकरीता प्रशासनाने जारी केलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी केले आहे.
विजांचा कडकडाट व पाऊस असतांना सचेत व दामिनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. वादळी वारा, वीजा चमकत असतांना घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावे, घराचे दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दुर राहा, मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे जावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांपासून दूर रहावे. गाडी चालवीत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यां च्या मध्ये झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दुर रहावे. जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली, उताराच्यां जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या सुरक्षित खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा. वीज पडल्यान, वज्राघात झाल्यास त्वरित रुग्णवाहीका व वैद्यकिय मदत घ्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथेरेमीयाचा धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तींना प्रथमोपचार : इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. ह्रदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची ह्रदयगती सीपीआर करुन सुरु ठेवावी. काय करु नये : गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागी, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणे टाळावित. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाइल व इतर इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. वीज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका. प्रवाहकीय पृष्ठुभागांशी संपर्क टाळावा. घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्यावेळी, वीज चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबल्सपासून लांब रहावे. वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना : वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासल पाऊस येत असल्यास तात्कार सुरक्षित स्थळी पोहचून आश्रय घ्यावा. शक्यतो मोठ्या झाडांचा, टिनपत्रे असलेल्या शेडचा, जिर्ण इमारतीचा आश्रय घेऊ नये. शेतात असतांना आभाळ असल्यास तात्काळ घराकडे जावे किंवा मजबूत अशा सुरक्षितस्थळाचा आश्रय घ्यावा. वाहन चालवित असल्यास तात्काळ सुरक्षितस्थळी आश्रय घेऊन स्वतः जवळील मोबाईल बंद करावा. विजेच्या वस्तुंशी संपर्क ठेवू नये व त्यापासून दुर राहावे. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असल्यास अशावेळी घरातच राहावे. या कालावधीत सर्व विद्युत उपकरणे अनप्लग करुन घ्यावे तसेच टिनपत्रे व मेटल शिट असलेल्या वस्तुंपासून दुर रहावे. झाडांच्या जवळ किंवा झाडाखाली आसरा घेऊ नये. वादळाने नुकसान झालेल्या भागापासुन, घरापासून दुर राहावे. पडलेल्या झाडापासून व विज तारांपासून दुर रहावे. पिकांची काळजी घ्यावी : हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे शेतामध्ये पिक काढणीस आलेल्या पिकांची तात्काळ काढणी करून घ्यावी तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीस ठेवलेले धान्य विक्रीस वेळ असल्यास ताडपत्रीने झाकून सुस्थितीत ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार