औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे विश्वकर्मा जयंतीदिनी संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वाटपाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डी.पी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड येथील गावंडे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. एस. आर. वद्राबाद, समर्थ फैब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल रामेश्वर बिच्चेदार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश जी. शिंदे, पालक प्रतिनिधी संजय शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक आणि फिटर या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तसेच वेल्डर, डिझेल मेकॅनिक, पत्रे कारागीर, ड्रेस मेकिंग व बेसिक कॉस्मेटोलॉजी या एक वर्षीय व्यवसायामधील जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बोर्ड प्रमाणपत्राचे वितरण हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी मार्गदर्शन करतांना आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यानी आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाज आणि देशाच्या विकासाचे मुख्य आधारस्तंभ बनून भविष्य उज्वल बनवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेतील उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी