उद्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान

पालकमंत्री संजय राठोड व आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती ; दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली ;
जिल्ह्यामध्ये 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' अभियानांतर्गत शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी लोहारा एमआयडीसीतील चिंतामणी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ‘दिव्यांग मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री संजय राठोड तर उद्घाटक म्हणून अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उपस्थित राहणार आहे. सोबतच वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.ॲड निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धिरज लिंगाडे, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदिप सुर्वे, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सकाळी ९ वाजतापासून दिव्यांग नोंदणी आणि अर्ज भरले जाणार असून त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध कार्यालयाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दिव्यांगांची आरोग्य तपासणी, समुपदेशन, सल्ला व मार्गदर्शन आणि विविध योजनांचे लाभ वाटप केले जाणार आहे. यात दिव्यांगांना युडीआयडी कार्ड नोंदणी, सेवायोजनाकरिता नोंदणी व कार्ड वाटप, राशनकार्ड पुरविणे, दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, महाशरद पोर्टल नोंदणी, विविध महामंडळाशी संबंधित व इतर दिव्यांगांच्या योजनांची माहिती, नोंदणी व लाभ देणे, दिव्यांगांना रोजगाराचे प्रशिक्षण, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शिधावाटप पत्रिका, पॅनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले पुरविणे इत्यादी लाभ देण्यासाठी विभागनिहाय स्टॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांनी https://forms.gle/WH3ZQjQxdBKfjiUE9 या लिंकवर भेट देवून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह उपस्थित राहून या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना व आवश्यक प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी