मध केंद्र योजना : साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान मिळणार

अर्ज करण्याचे आवाहन : :
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशापालनासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण आणि साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेंतर्गत ५० टक्के स्वगुतंवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष किंवा छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करणे हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता ठरविण्यात आली असून त्यानुसार वैयक्तिक मधपाळांसाठी अर्जदार हा साक्षर असावा. वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळांसाठी किमान १० वी पास असावा. वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे. त्यांच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्थांसाठी पात्रतेनुसार संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. योजनेच्या अटी व शर्तींनुसार लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, तिसरा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे किंवा 07232-244791 मो.न. 9420771535 या क्रमांकावर किंवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5 मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806, दूरध्वनी-02168 260264 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी