राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १४ हजार २३५ प्रकरणे निकाली

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ३ हजार ०७३ प्रलंबित व ११ हजार १६२ वादपूर्व असे एकूण १४ हजार २३५ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीला वकील आणि पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते या राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, जिल्हा वकील संघाचे सचिव अनिल बजाज, तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पक्षकारांना स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे ही प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. या निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मुल्य २३ कोटी ५६ लाख ९० हजार ४११ रूपये होते. यामध्ये विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून १०५० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच लोकअदालतमध्ये ३४ जोडप्यांचा संसार सावरला आहे. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका व विशेष म्हणून जिल्हा परिषद अंतर्गतचे ग्रामपंचायत कराबाबतची वादपूर्व प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी श्री. हांडे आणि श्री. नहार व त्यांच्या सहकारी न्यायाधीशांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेवून त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवून देण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा सरकारी वकीलांसह विविध विभागाचे अधिकारी, बॅंका आणि सहकारी संस्थांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी