कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी 143 कोटींचा निधी - संजय राठोड

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र स्वयंसहाय्यता गटांना वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
मंत्री श्री.राठोड म्हणाले, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण केंद्र राज्य शासन अनुक्रमे 60 ल 40 टक्के असे असून, योजनेचे प्रकल्प मूल्य 1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपजीविका घटक अंतर्गत प्रत्येक पाणलोट प्रकल्पात फिरता निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना 30 हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना 60 हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रकल्प क्षेत्रात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत प्रभाग संघ व स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून पात्र स्वयं सहाय्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी