शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करतांना दक्षता घ्यावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा कृषि विभागाच्या सूचना जारी : परवानाधारकाकडूनच कीटकनाशकांची खरेदी करा : फवारणीआधी आरोग्य तपासणी : संरक्षक किट घालूनच कीटकनाशकांची फवारणी करावी : नशापानी करुन फवारणी करु नये :
सध्या जिल्ह्यामध्ये कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करतांना दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. फवारणी करतांना काय काळजी घ्यावी याविषयी कृषि विभागाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार परवानाधारक विक्रेत्याकडूनच कीटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी केलेल्या कीटकनाशकाचे पक्के बील घ्यावे. खरेदी केलेल्या कीटकनाशकांचे नाव, उत्पादन तारीख, बॅच क्रमांक, अंतिम मुदत दिनांक इत्यादी तपशील बिलावर नमुद करण्यात आला असल्याबाबत खात्री करावी. खरेदी केलेले कीटकनाशके घरामध्ये लहान मुलांपासून दूर राहतील अशा ठिकाणी ठेवावेत. शक्यतो बंद पेटीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून उंदीरासारख्या प्राण्यांनी कीटकनाशकांचा डब्बा कुरतडल्यास कीटकनाशक बाहेर येवून विषबाधा टाळता येईल. प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये दर आठवड्याच्या मंगळवारी व शुक्रवारी विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येते. कीटकनाशकांची फवारणी करण्यात अगोदर शेतकरी किंवा शेतमजूरांनी स्वतःची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. एकापेक्षा जास्त कीटकनाशकांची एकत्रीत फवारणी करावयाची असल्यास संबधीत विक्रेता यांचेकडुन एकत्र करावयाच्या कीटकनाशकांची योग्य ती माहिती व त्याच्या प्रमाणाबाबत खात्री करून मिश्रण तयार करावे. मिश्रण तयार करताना ते हाताने ढवळु नये तसेच चेहऱ्यावर उडणार नाही किंवा मिश्रणाची वाफ नाकावाटे शरीरात जाणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी ही सकाळी व संध्याकाळी करुन नेहमी हवेच्या दिशेने करावी. पुरेशी न्याहारी, नास्ता, जेवण करुनच फवारणीचे कामकाज करावे. फवारणीचे द्रावण तयार करतांना तोंडाला मास्क किंवा दुपट्टा गुंडाळून असावा, जेणे करुन औषधांचा गॅस नाकावाटे शरीरामध्ये जाणार नाही. तोंडावर मास्क, डोळ्यावर चष्मा, शरीर पुरेसे झाकेल अशा प्रकारची संरक्षक किट घालूनच कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीदरम्यान जेवण किंवा न्याहारी करायची असल्यास चेहरा, हात व पाय साबनाने स्वच्छ धुवून घ्यावेत. सलग फवारणी करीत असतांना दर दोन-तीन तासांनी लघु विश्रांती घ्यावी. विश्रांती घेतांना फवारणी केलेल्या क्षेत्रापासून दुर थांबावे. फवारणीचे कामकाज आटोपल्यावर घरी येवून साबनाने स्वच्छ आंघोळ करुनच इतर कामकाज करावे व फवारणी दरम्यान घातलेले कपडे धुण्याकरीता टाकावेत, फवारणी दरम्यान डोळ्यांची आग होणे, नाकाची आग होणे, डोके दुखने, मळमळ, चक्कर, अस्वस्थता अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क करावा व फवारणी दरम्यान वापलेल्या कीटकनाशकांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यास द्यावी, जेणेकरुन योग्य उपचार करणे सोईचे होइल. काय करु नये : फुटलेल्या गळक्या स्प्रे पंपानी फवारणी करु नये, आजारी किंवा अशक्त असलेल्या व्यक्तींनी कीटकनाशकाची फवारणी करु नये किंवा अशा व्यक्तींना शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणीचे कामकाज देवू नये. उपाशी पोटी कीटकनाशकांची फवारणी करु नये. तंबाखु, बीडी सिगारेट, दारू किवा कोणत्याही प्रकारचे नशापानी करुन फवारणी करु नये. अंगावर जखमा असलेल्या व्यक्तींनी फवारणीची कामे करू नये. तीव्र उन्हामध्ये किंवा जास्त घाम निघत असेल अशा दमट वातावरणामध्ये फवारणीचे कामकाज टाळावे. हवेच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
कीटकनाशकांची फवारणी करतांना योग्य ती काळजी घेवूनच फवारणी करावी अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी व शेतमजुरांनी दक्षता घेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी