आदिवासी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. परंतु लाभ मंजूर होऊनही कागदपत्रांची पुर्तता केली जात नसल्याने अशा लाभार्थ्यांचा निधी अखर्चित राहतो. त्यामुळे लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.            आदिवासी विकास विभागाच्यावतीने न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गंत आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात शेळीगटासाठी अर्थसहाय्य, बियाणेसाठी अर्थसहाय्य, तुषार सिंचन, ताडपत्री तसेच आदिवासी मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलसाठी अर्थसहाय्य अशा विविध स्वरुपाच्या योजनांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ रोख रक्कमेच्या स्वरुपात डीबीटीद्वारे देण्यात येतो. सदर लाभ प्रथम हप्ता 75 टक्के व साहित्याची खरेदी केल्यानंतर 25 टक्के अशा स्वरूपात देण्यात येतो. आदिवासी लाभार्थी प्रथम हप्त्यासाठी आवश्यक असलेले लाभार्थ्यांचे बँकेचे विवरण जसे बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स आणून देत नाही. काही लाभार्थी पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी साहित्य खरेदी केल्याची बील, पावती आणून देत नाही. अशा कारणांमुळे लाभार्थ्यांना देय लाभाची रक्कम वेळेवर खर्च होत नाही. सदर योजनेंतर्गत सन 2016-17 पासून डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राच्या प्रती मिळत नसल्याने सदर योजनेचा निधी वर्षानुवर्ष अखर्चित राहतो. त्यामुळे पांढरकवडा प्रकल्पांतर्गंत येत असलेल्या केळापूर, घाटंजी, मारेगांव, झरी जामणी, राळेगांव, यवतमाळ, वणी व बाभूळगांव या तालुक्यातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची तातडीने पुर्तता करावी. लाभार्थांना वारंवार कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी यापुर्वी देखील कळविण्यात आलेले आहे. गेल्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या लाभार्थी मेळाव्यामध्ये सुध्दा कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. असे असून सुध्दा अद्यापही काही लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कागदपत्राच्या पुर्ततेसाठी दि.8 ऑक्टोंबर ही अंतीम मुदत आहे. या मुदतीपर्यंत लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी. या मुदतीनंतर मंजूर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी