दारव्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध - संजय राठोड

> छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ;
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दारव्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. येणाऱ्या काळात दारव्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दारव्हा नगरपरिषदेच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, लोकशाहीर नंदेश उमप, जिपच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार आदी उपस्थित होते. दारव्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही दारव्हावासियांची मागणी होती. अनेक वर्षापासूनची ही मागणी आज पूर्ण झाली. येथील बोदेगाव साखर कारखान्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी लवकरच शेतकरी मेळावा आयोजित केला जाणार आहे. दारव्ह्यातील प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि समृद्धी यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करित आहे. दारव्ह्यात सर्वधर्मसमभावाने विकासाची कामे करण्याची भूमिका आहे. शहर आणि तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. येणाऱ्या काळात विकासांची कामे प्रामाणिकपणे होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
अडाण प्रकल्पासाठी दोनशे कोटी मंजूर अडाण धरणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी वाल्मी संस्थेकडून सर्व्हे करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आगामी सण उत्सवांच्या सर्वांना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला, त्याबद्दल आभार व्यक्त केले.
मृणाली कुलकर्णी म्हणाल्या, यवतमाळमध्ये पहिल्यांदाच आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी जनतेने केली ती पूर्ण करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले, ही कौतुकाची बाब आहे. यावेळी नागपूर ते दारव्हा प्रवासातील अनुभव सांगून रस्त्यांविषयी त्यांनी कौतुक केले. यावेळी आर्कीटेक्ट अमर केळकर, मुर्तीकार रामू चव्हाण यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी दारव्हा नगरपरिषदेच्यावतीने मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नगरपरिषदेमार्फत आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते करण्यात आला. लोकशाहीर नंदेश उमप यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित पोवाडे सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी