कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय शिवार फेरी

> शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळणार ; > ५० हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित ; > खरीप पिक उत्पादन तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक ; > कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने, संधीवर चर्चासत्र ; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापन दिनाचे औचित्य साधून अकोल्यातील मुख्यालय येथे यावर्षी दि. २९ ते १ ऑक्टोबर २०२३ या तीन दिवसीय कालावधीत विद्यापीठ शिवार फेरी आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विद्यापीठाद्वारे या शिवार फेरी आणि थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिवार फेरीचे जिल्हानिहाय कार्यक्रम ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी अकोला, वाशीम, बुलढाणा व अमरावती शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार दि ३० सप्टेंबर रोजी वर्धा, यवतमाळ, गडचिरोली व गडचिरोली, रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये ही शिवार फेरी होणार आहे. या शिवार फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची दि. २९, ३० सप्टेंबर व दि. १ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत अकोला येथील विद्यापीठ क्रीडांगणासमोरील शेतकरी सदन येथे प्रत्येकी २० रुपये शुल्क भरून नोंदणी करण्यात येईल. या शेतकरी, संशोधन, धोरणकर्ते आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक कृषी पद्धतींबद्दल जाणून घेणे आणि शाश्वत व पर्यावरणास अनुकूल पद्धतींची खात्री करून पिक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या शिवार फेरी तसेच थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये वैशिष्ट्य पूर्ण बाबींचा समावेश असणार आहे. यामध्ये कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चार पिके, धान पिके आणि त्यांचे तंत्रज्ञान इत्यादी अशा २२० प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्रांचे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके होणार आहेत. १६ खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके होणार आहेत. विद्यापिठाच्या विविध संशोधन विभागांचे ११०० हेक्टर क्षेत्र, शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवसामध्ये राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रदेशातील कृषी क्षेत्रा समोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चासत्र होईल. शेतकऱ्यांनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी केले आहे. तसेच दि. ३० सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून शिवार फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश ऊ. नेमाडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी