जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा संपन्न

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज जिल्हाधिकारी तथा परिषदेचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मागील सभेतील ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला व त्या लवकरात लवकर निकाली काढून त्याचा कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच आज झालेल्या सभेतील तक्रारी प्राप्त झाल्यापासून सात दिवसात निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात ही बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, अन्न औषध प्रशासन, महावितरण, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी तसेच समितीमधील अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे, ॲङ राजेश पोहरे, शेखर बंड, प्रमोदकुमार बाजोरीया, बिरेद्र चौबे, कैलासचंद्र वर्मा, संतोष डोमाळे, प्रकाश बुटले आदी उपस्थित होते. यावेळी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करुन मास विक्रीची दुकाने सुरु करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक प्रभावित होते व अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. प्रा. केशव चटुले यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर हवा, प्रसाधनगृह आणि इतर सुविधा नाहीत, त्या उपलब्ध करुन द्याव्यात. पुसद येथील छत्रपती शिवाजी चौक ते श्रीरामपुर रोडवरील अतिक्रमणामुळे अपघात होत आहेत. त्याविषयी वाहतुक पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने कार्यवाही करावी. ऐन सणासुदीच्या काळात मिठाई व खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. पुसद येथील मार्टमध्ये तळलेले खाद्य पदार्थ स्वत:चे लेबल लावून विकले जात असून त्यांची तपासणी करावी. जिल्ह्यातील ट्रक, ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावण्याबाबत मोहिम राबवावी. महागाव तालुक्यातील सवना येथील विठ्ठल रुख्म‍िणी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींना सवलतीने पास प्रवेश देणे व त्यासाठी पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सदस्य संतोष डोमाळे यांनी शहरातील दत्त चौक ते आठवडी बाजार परिसरात फळ व भाजी विक्रेत्यांच्या रस्त्यावरील दुतर्फा दुकांनामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. त्यांना भाजी मार्केटमधील कायमस्वरुपी निश्चित ठिकाण देवून वाहतुकीचा अडथळा दुर करावा, असे सांगितले . सदस्य डॉ. के. एस. वर्मा यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अडतदारांकडून कापसाच्या धान्यांच्या खरेदीतील चुकाऱ्याची कच्ची पावती दिली जाते ती पक्की सुस्पष्ट संगणकीकृत पावती द्यावी. पन्नास हजारावरील नगदी चुकारे रोखून ते चेकद्वारे द्यावे. शेतकरी ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याबाबत कार्यवाही करावी. यवतमाळ ते दारव्हा रोडवरील बोरीअरब येथे अपघात होत असून या रस्त्यावर सौर ऊर्जेवरील पथदिवे बसवण्यात यावे. तसेच बोरीअरबमध्ये वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी असून येथील विद्युत पुरवठा तपोना उपकेंद्राला जोडल्यास सुरळीत विज पुरवठा होण्यास मदत होईल असे सांगितले. सदस्य प्रकाश बुटले यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेले नाही ते लवकरात लवकर व्हावे. ई पीक पोर्टलबाबत शेतकऱ्यांना अडचणी येत आहे त्या सोडवाव्यात. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना तात्काळ मदत मिळावी. आर्णी तालुक्यातील कोसदणी घाटात दरड कोसळण्याच्या घटनेबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. भूमी अभिलेख विभागाच्या ई मोजणी बाबत जनजागृती व्हावी. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सदस्यांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा केली. या तक्रारी प्राप्त झाल्यापासून सात दिवसात निकाली काढाव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी