‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अभियानासाठी विभागांनी समन्वयाने नियोजन करावे : दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या समस्या एकाच ठिकाणी सुटाव्या, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आज आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, त्यामुळे योग्य जागेची निवड करण्यात यावी. दिव्यांगांसाठी शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती दिव्यांगांना व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध विभागांनी माहितीचे स्टॅाल लावावे.
मेळाव्यात एकाच ठिकाणी विविध बाबींचा लाभ दिव्यांगांना कसा देता येतील, यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे. मतदान नोंदणी, स्वयंरोजगार कार्ड, आधार कार्ड, विविध योजनांसाठी अर्ज भरून घेण्यासोबतच त्यांना कार्यक्रमातच लाभ देता आला पाहिजे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांची भोजन व बैठक व्यवस्था उत्तम असावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शासनाच्या विविध महामंडळांसह समाजकल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती पत्रके तयार करून वितरीत करता येतील का याबाबत नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी