अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र लाखोडे यांची निवड

अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष या पदावर दै. दिव्य मराठीचे उपसंपादक रविंद्र लाखोडे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.
वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना राज्य शासनातर्फे अधिस्वीकृती पत्रिका देण्यासंबंधीचे कामकाज राज्य व विभागीय समितीव्दारे केल्या जाते. अमरावती विभागीय समितीवरील सदस्यांची निवड करुन समितीचे गठण नुकतेच राज्य शासनाने केले आहे. त्यानुसार अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयात अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीसाठी प्रथम बैठक आज घेण्यात आली.
समितीचे सदस्य सर्वश्री जयराम आहुजा, गोपाल हरणे, सुरेंद्र आकोडे, राजेंद्र काळे, विभागीय माहिती उपसंचालक अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक संचालक (माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ यावेळी उपस्थित होते. अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोपाल हरणे यांनी सूचक म्हणून अध्यक्ष पदासाठी रविंद्र लाखोडे यांचे नाव सुचविले. त्यास सदस्य जयराम आहुजा यांनी अनुमोदन दिले. सदस्य सुरेंद्र आकोडे, राजेंद्र काळे यांनी श्री. लाखोडे यांच्या नावाला समर्थन दिले. त्यानुसार समितीच्या सर्व सदस्यांच्या सर्वानुमते श्री. लाखोडे यांची समितीच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय माहिती उपसंचालक श्री. आलुरकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून नवनियुक्त अध्यक्ष श्री. लाखोडे यांचा सत्कार केला. यावेळी अन्य सदस्यांनीही श्री. लाखोडे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी