नेत्रदान पंधरवड्यात ३९१ जणांची नेत्रदानासाठी संमती

जिल्ह्यातील ९ हजार ६२३ रुग्णांची नेत्रतपासणी : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात जिल्ह्यातील ३९१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी संमती दिली तर विविध ठिकाणी झालेल्या नेत्रतपासणी शिबिरात ९ हजार ६२३ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.
यवतमाळच्या सामान्य रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आयुर्वेदिक महाविद्यालय येथे या नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन दि. २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाजोरीया , आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाणे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, नेत्र विभाग प्रमुख डॉ. वाघ, डॉ. आकाश भोजणे आदी तज्ञ डॉक्टरांनी नेत्रदानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच दि. २६ ऑगस्ट रोजी रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे मोफत नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील वाहनचालक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी मिळून ३२७ नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी २५० रुग्णांच्या चष्म्याचे नंबर काढण्यात आले व ११ रुग्ण मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. या पंधरवड्यादरम्यान महात्मा जोतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर पथनाट्यातून जनजागृती केली.
या पंधरवड्यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांमार्फत नेत्र तपासणी शिबिरे व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या नेत्रदान पंधरवड्यात २५३ रुग्णांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. तर एकूण ३९१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी संमती देवुन नेत्रदान संमतीपत्र भरून दिले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी