जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा - डॉ.पंकज आशिया

9 सप्टेंबरपर्यंत सलोखा सप्ताह ; नाममात्र शुल्क भरुन घेता येणार लाभ : एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांच्या अदलाबदलसाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत सलोखा सप्ताह राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे.
शेतजमिनीचा ताबा वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन सौख्य वाढीस लागण्यासाठी शासनाने ‘सलोखा’ नावाची ही योजना सुरु केली आहे. बरेचदा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असतो. अशावेळी वाद उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशी प्रकरणे सामंजस्याने अदलाबदल होणे आवश्यक असते. यासाठीच ही योजना शासनाने याचवर्षी जानेवारी मध्ये सुरु केली आहे. एकाच गावातील दोन शेतकऱ्यांकडे परस्परांच्या शेतीचा ताबा 12 वर्षांपासून असल्यास त्यांनी आपल्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, गाव तंटामुक्त समिती यापैकी कोणाशीही संपर्क साधून शेतजमीन अदलाबदलसाठी अर्ज सादर करावा. तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात देखील असे शेतकरी संपर्क साधू शकतात. शेतकऱ्यांच्या नावाची अदलाबदल करण्यासाठी दि.9 सप्टेंबर पर्यंत सलोखा सप्ताह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणावर निकाली काढण्याचे धोरण आहे. विशेष म्हणजे ही अदलाबदल शेतकऱ्यांना नोंदणी शुल्क 1 हजार व मुद्रांक शुल्क 1 हजार रुपये असे नाममात्र शुल्क भरून भरून करता येणार आहे. दोनही शेतकऱ्यांच्या संमतीने असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार आहे. सदर शेतजमीनीची अदलाबदल करून मुळ मालकांचे नाव चढवून शेतकऱ्यांना सुधारीत सातबारे देखील वितरीत केले जातील, त्यामुळे शेतकऱ्यांनी सप्ताह काळात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी